‘गाता रहे…’
- Suhas Kirloskar | suhass.kirloskar@gmail.com
राजहंस प्रकाशित, सुहास किर्लोस्कर लिखित ‘गाता रहे…’ हे पुस्तक ३ नोव्हेंबर २३ रोजी प्रकाशित झाले. काव्याला चाल कशी दिली जाते, काव्याचे प्रकार, लय तालाचा परिचय, संगीत दिग्दर्शन, संगीत संयोजन, ताल संयोजन करण्याची प्रक्रिया कशी असते, याचे सोदाहरण विवेचन या पुस्तकामध्ये वाचायला मिळणार आहेच शिवाय संगीताचे प्रकार, गाण्यातील पॉझ, यॉडलींग सारख्या अनोख्या प्रकारांची तोंडओळख होते. ३० पेक्षा अधिक वाद्यांचा तपशीलवार सोदाहरण परिचय हे आणखी एक पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. अनेक दिग्गज कलाकारांची व वाद्यांची रंगीत प्रकाशचित्रे असल्यामुळे वाद्य, कलाकार, गाणी यांची माहिती वाचणे प्रेक्षणीय झाले आहे. ही वाद्ये कोणत्या गाण्यात वापरली आहेत याची उदाहरणे या पुस्तकामध्ये आहेतच शिवाय त्या गाण्यांची प्ले लिस्ट ऐकता ऐकता पुस्तक वाचनाचा आनंद घेता येतो, हे विशेष.
संगीत आपण का ऐकतो? वेळ कसा घालवावा हा प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच नाही. जाणते-अजाणतेपणी संगीत जीवनाचे अविभाज्य अंग बनले आहे. जावेद अख्तर यांच्या शब्दात सांगायचे झाले तर ‘धडकन ताल है, सांस है सूर, जीवन है एक गीत’. संगीत जुने असो वा नवे, ‘आपले’ असो वा ‘त्यांचे’, शास्त्रीय-उपशास्त्रीय असो वा चित्रपट संगीत, त्यातले बारकावे जाणून घेण्याच्या मधुकर वृत्तीने वारंवार ऐकत राहिले तर कानसेन रसिक होण्यास आपली सुरुवात होते. नवी जुनी गाणी ऐकताना त्यामधील बारकावे आस्वादकाच्या भूमिकेतून वेगवेगळ्या दृष्टीकोनातून वाचकांसमोर मांडण्याचा लेखकाचा हा प्रयत्न आहे.
‘गाता रहे…’ पुस्तकामधील अनुक्रमणिका
- संगीताची ओळख: मुखडा, अंतरा, संचारी / लय आणि ताल / तालाचे प्रयोग / वॉल्ट्झ / बोसा नोवा
- संगीत प्रकार: अभंग, भजन, भक्तिगीत, प्रार्थना / सुफी संगीत / कव्वाली / गझल / ठुमरी, दादरा, चैती, होरी / लोकसंगीत / रविंद्र संगीताचे माधुर्य / जॅझ, पॉप, रॉक
- गाणे तयार होताना: संगीत दिग्दर्शन / संगीत संयोजन / तालवाद्य संयोजन / स्केल चेंज आणि मूर्च्छना / यॉडलींग / गाण्यातला पॉझ / कमीत कमी वाद्यांचा वापर असलेली गाणी / गाण्यातला भाव – अभिनय / आवाज की दुनिया
- वाद्य संगीत:
- की वाद्ये: अकॉर्डीयन / पियानो | फुंकून वाजवण्याची वाद्ये: बासरी / क्लॅरीनेट / सॅक्सोफोन / ब्रास सेक्शन – ट्रम्बोन / फ्लुगेलहॉर्न – ट्रम्पेट
- तंतूवाद्ये: सतार / मेंडोलीन / बेंजो, चरांगो, उद, रबाब / सरोद / गिटार / इलेक्ट्रिक, बेस आणि हवाईयन गिटार / गिटार इफेक्ट
- गिटार – खोलो खोलो दरवाजे……..
- आघात करून वादन करण्याची वाद्ये: जलतरंग / संतूर / ग्लॉक्स, झायलो आणि व्हायब्राफोन
- घर्षण करून वादन करण्याची तंतुवाद्ये: तार शहेनाई / सारंगी / व्हायोलीन / व्हायोलीन कुटुंब
- तालवाद्ये: तबला, मृदंगम, पखवाज, जेंबे, ढोलक, ढोल, दिमडी, संबळ, ड्रम, अकॉस्टीक ड्रम आणि इलेक्ट्रॉनिक ड्रम, कॅस्टनेटस
- समारोप
‘गाता रहे…’ जवळच्या बुक शॉपमध्ये उपलब्ध आहेच. त्याचबरोबर राजहंस प्रकाशनच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
https://www.rajhansprakashan.com/product-details/gata-rahe-gata-raha
‘अमेझॉन’ वरही पुस्तक खरेदी करू शकता: https://amzn.eu/d/d2b3qqO
पुस्तक खरेदीकरीता/पुस्तकावर प्रतिक्रिया देण्यासाठी लेखक सुहास किर्लोस्कर यांच्याशी संपर्क साधू शकता
9422514910 | suhass.kirloskar@gmail.com
संदर्भासहित संगीत
असं म्हणतात की संगीत ही एक अधिग्रहित अभिरुची आहे. Music is an acquired taste. म्हणजेच काय तर जसा कलाकार म्हणून तुम्हाला कलेचा शिक्षणातून विस्तार करत राहावा लागतो, तसंच तुम्हाला श्रोत्यापासून रसिकाचा प्रवास
करायचा असेल तर अधिकाधिक ज्ञानातून तुम्हाला या रसिकतेचा विस्तार करत राहावा लागतो. या दोन्ही प्रवासांना अंत नाही हीच या प्रवासांमधली आनंदाची बाब आहे! अमुक अमुक गोष्ट आपल्याला कळली, असा पूर्णविराम लागण्यापेक्षा ती गोष्ट आपल्याला कळत राहते, उलगडत 0राहते… आणि प्रत्येक टप्प्यागणिक आपलं क्षितिज विस्तारत राहतं. फैज़चा शेर आहे – ‘फैज़ थी राह सरबसर मंज़िल, हम जहाँ पहुँचे, कामयाब आए!’
पण या प्रवासाला एक सहयात्री लाभला तर हा प्रवास अधिक रोचक होतो. सुहास किर्लोस्कर लिखित ‘गाता रहे…’ हे पुस्तक म्हणजे चित्रपट संगीताच्या (आणि केवळ चित्रपट संगीताच्याच नव्हे तर एकूण भावसंगीताच्या) अजब, अनोख्या दुनियेच्या रंजक वळणावळणाच्या वाटांवरला आपला सहप्रवासी आहे. किंवा असं म्हणा ना की ज्या चित्रपटाच्या गीतावरून या पुस्तकाचं शीर्षक प्रेरित आहे, तसंच हे पुस्तक या दुनियेचं आपलं ‘गाइड’ आहे, वाटाड्या आहे! ‘गाता रहे…’ हे केवळ माहितीपर पुस्तक नव्हे तर एक संदर्भग्रंथ आहे असं मी म्हणेन. एकदा वाचून पुन्हा कपाटात बंद करून ठेवण्यासारखं हे पुस्तक नाही. गाणं ऐकता ऐकता एखाद्या गाण्यातल्या कडव्याच्या आधी एखादी वेगळ्या वळणाने जाणारी ओळ ऐकली की “ही संचारी आहे का?”, किंवा एखाद्या गाण्याची लय अथवा ताल बदलल्यावर “नेमकं काय घडलं इथे?” – असे प्रश्न तुम्हाला पडले तर ‘गाता रहे…’ तुमच्या हाताशी असावं असं हे पुस्तक आहे.
‘ओ मेरे हमराही, मेरी बाह थामे चलना…’ असं तुम्ही म्हणू शकाल असा एक हमराही म्हणजे किर्लोस्करांचं हे पुस्तक! पूर्वी ‘शेअरिंग’ या शब्दाचा अर्थ लोकांनी एकत्र येऊन आदानप्रदान करणं असा होता. पण याच ‘शेअर’चं अस्तित्व आभासी जगातलं बटण होण्यापर्यंत आलं, आणि त्याचा मूळ अर्थ गायब झाला. गाण्याच्या ‘शेअरिंग’चंही असंच झालं आहे. पूर्वी आपण एकत्र येऊन गाणं ऐकायचो आणि या एकत्र येण्यातून श्रोते घडायचे. मैफलींचे ‘इव्हेन्ट्स’ झाले, गप्पांच्या ‘कमेन्ट्स’ झाल्या आणि श्रोते तयार होण्याची ही जुनी व्यवस्था कोलमडू लागली. पण अशा वेळी ‘गाता रहे…’सारखं पुस्तक बरोबर असेल तर ते आपल्याशी संवाद साधतं. किर्लोस्करांची भाषा या प्रकारच्या विषयानुरूप सोपी आहे. शिवाय मला आवडलेली एक गोष्ट म्हणजे हे पुस्तक पहिल्या ओळीपासून विषयाला हात घालतं. गाण्याचे घटक, गाण्याचे प्रकार, वाद्यांची माहिती, त्या अनुषंगाने येणारी आणि जी सहसा आपल्याला आढळत नाही अशी वादकांची माहिती ते विविध गाण्यांचं रसग्रहण असा एक फार मोठा पल्ला हे पुस्तक गाठतं. विशेषतः गेल्या सात-एक दशकांचा हिंदी-मराठी सिने आणि भावसंगीताचा काळ ज्यांना समजून घ्यायचा असेल, त्यांनी हे पुस्तक जरूर त्यांच्या संदर्भग्रंथांच्या शेल्फमध्ये ठेवावं. बहुतांश प्रमाणात संगणकीय संगीत निर्माण होणाऱ्या या काळामध्ये अकुस्टिक-ॲनलॉग संगीत जगत कसं होतं याची अतिशय परिणामकारक तोंडओळख म्हणजे सुहास किर्लोस्कर लिखित ‘गाता रहे…’ हे पुस्तक आहे.
भावसंगीतात अथवा चित्रपटसंगीताच्या क्षेत्रात एकूणच डॉक्युमेन्टेशनचा अभाव असताना या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांनी एवढी माहिती एकत्र करून एक पोकळी भरून काढली, याबद्दल सुहास किर्लोस्करांचं अभिनंदन आणि त्यांच्या पुढच्या लेखन प्रपंचाला हार्दिक शुभेच्छा!
कौशल इनामदार, मुंबई
Leave a Reply