REVIEW Dr Aparna Mayekar 0

अरविंद मयेकर यांच्या सतारसाथीचे स्मरण गुंजन

  • नीला शर्मा

Arvind Mayekar 1हिंदी – मराठी चित्रपटगीते, भावगीते व नाट्यसंगीतात सतारीच्या साथीची नादमधुर मुद्रा उमटविलेल्या अरविंद मयेकर यांच्या आठवणी जागवणारी ‘गीत सितार’ ही मैफल सर्वार्थाने आगळीवेगळी ठरली. त्यांच्या पत्नी डॉ. अपर्णा मयेकर यांनी त्यांच्या सहजीवन व मयेकरांच्या कारकिर्दीतील विशेष टप्प्यांबद्दल माहिती देत काही गाणी स्वतः सादर केली.

‘नादमुद्रा’ तर्फे संगीत सुवर्णयुगातील प्रतिभावान व प्रयोगशील सतारवादक मयेकर यांनी सतारीची साथ केलेल्या काही अजरामर गीतांची प्रस्तुती नुकतीच केली. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात रसिकांना अनेक गीतांमागचे किस्से अपर्णाताईकडून ऐकायला मिळाले. संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या त्या कन्या. रेखा डावजेकर या नावाने लग्नापूर्वी वाद्यवृंदांच्या माध्यमातून नावारूपास आलेल्या या गायिकेचे लग्नानंतर अपर्णा मयेकर झाले.

“तुझी कला अव्याहत चालू दे. माझी पत्नी म्हणून नव्हे तर तुझा पती म्हणून माझी ओळख कानावर पडू दे, या शब्दात त्यांनी प्रोत्साहन दिले”, अशी भावपूर्णआठवण सांगितली. राहुल देव बर्मन यांचे ते आवडते कलावंत होते. ते त्यांना लाडाने मया म्हणत व गीतांमधील सतारसाथीच्या आव्हानात्मक जबाबदाऱ्या त्यांच्यावर विश्वासाने सोपवत, असे सांगून त्यांनी स्पष्ट केले की, मयेकरांचे सतारवादनातील कौशल्य कमी वयातच लक्षात आल्याने पं. रविशंकर यांनी स्वतःहून त्यांना शिकवण्यासाठी वडिलांकडून मागून घेतले. नंतर उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान व पं. जयराम आचार्य यांच्याकडूनही त्यांना विद्या मिळाली.

Dr Aparna Mayekar 2या कार्यक्रमात गणराज रंगी नाचतो, संथ वाहते कृष्णामाई, लाजऱ्या कळीला भ्रमर सांगतो काही, आनंदी आनंद गडे, ओ बसंती पवन पागल, वो जब याद आए, हमें तुमसे  प्यार कितना, बहारों मेरा जीवन भी सवाँरो, तेरे नैना तलाश करें, पिया तोसे नैना लागे रे, दिल पुकारे आ रे, तेरे बिना जिंदगी से कोई, आदी गीते सावनी सावरकर, रेणू बोरकर, माधुरी कासट, नील सुळे, निशांत पाटे, सचिन इंगळे आणि डॉ. अपर्णा मयेकर यांनी प्रस्तुत केली. अमृता ठाकूर देसाई, रशिद शेख, सचिन वाघमारे, किरण एकबोटे, वासुदेव बापट, मनीष सबनानी, सचिन इंगळे आणि विशेष सतारसाथ कल्याणी देशपांडे यांची होती. सूत्रसंचालन सोनाली श्रीखंडे यांनी केले.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *